धुळ्यात लग्नाचं वऱ्हाड काळाच्या विळख्यात! भीषण अपघातात ४ ठार, १२ जखमी; अक्कलपाडा जवळील थरार
Dhule Accident News: धुळे जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे लग्नकार्य आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या वऱ्हाडींच्या क्रूझर गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. आनंदाच्या क्षणांचे रूपांतर अवघ्या काही क्षणांत दुःखात झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (४ एप्रिल) दुपारी शिरडाणे येथील वऱ्हाड तामसवाडी येथे लग्न आटोपून क्रूझर (MH 18 W 6226) ने परतत होते. अक्कलपाडा गावाजवळ समोरून येणाऱ्या एका अनियंत्रित वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि क्रूझर गाडी उलटली.
- मृत्यू: ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १ जणाने उपचारादरम्यान प्राण गज्योत मालवली.
- जखमी: १२ हून अधिक प्रवासी जखमी असून, त्यांना तातडीने साक्री आणि धुळे येथील हिरे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मदतीसाठी धावले प्रशासन
अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. विशेष म्हणजे, सिव्हिल सर्जन डॉ. रवींद्र सोनवणे यांनी स्वतः घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. सध्या जखमींवर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.
आमदार राम भदाणे यांचे आवाहन
या घटनेनंतर धुळे ग्रामीणचे भाजप आमदार राम भदाणे यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे:
"लग्नसराईचे दिवस असल्याने प्रवासात मोठी गर्दी असते. वाहन चालवताना आणि भाड्याची गाडी निवडताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी. वाहनचालकाचा एक छोटासा निष्काळजीपणा अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त करू शकतो. हा प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे."
वाचकहो, काळजी घ्या!
रस्त्यावरील वेगावर नियंत्रण ठेवा आणि प्रवासात सुरक्षिततेला प्राधान्य द्या. या घटनेमुळे शिरडाणे आणि तामसवाडी गावांवर शोककळा पसरली आहे.


thanks for comment.